YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18

18
एलीया अहाबाकडे येतो
1पुष्कळ दिवस लोटल्यावर, तिसरे वर्ष लागले तेव्हा एलीयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे.”
2त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलीया निघाला. त्या वेळी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता.
3अहाबाने आपला घरकारभारी ओबद्या ह्याला बोलावणे पाठवले; हा ओबद्या परमेश्वराला फार भिऊन वागत असे.
4ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.
5अहाब ओबद्यास म्हणाला, “देशात फिरून पाण्याचे झरे, नाले असतील ते सर्व शोधून पाहा; घोडे व खेचरे ह्यांचा जीव वाचवण्यापुरते गवत कोठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरणार नाहीत.”
6सगळा देश धुंडाळावा म्हणून त्यांनी तो आपसात वाटून घेतला; एका मार्गाने अहाब गेला व दुसर्‍या मार्गाने ओबद्या गेला.
7ओबद्या वाट चालत असता एलीया त्याला भेटला; त्याने त्याला ओळखले आणि दंडवत घालून त्याला म्हटले, “माझे स्वामी एलीया ते आपणच काय?”
8तो म्हणाला, “होय, तोच मी; जा, आपल्या धन्याला सांग की, एलीया आला आहे.”
9तो म्हणाला, “मला आपल्या दासाला मारून टाकण्यासाठी अहाबाच्या हाती आपण देऊ पाहता असा मी काय अपराध केला आहे?
10आपला देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठवले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही; तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलीया त्यांना आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यायला लावी.
11आणि आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे तू जाऊन आपल्या धन्याला सांग.
12मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे.
13ईजबेलीने परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध केला तेव्हा मी परमेश्वराचे शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवून ठेवले व त्यांना अन्नपाणी पुरवले, हे वर्तमान माझ्या स्वामींच्या कानी आले नाही काय?
14आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे जाऊन आपल्या धन्यास सांग; पण तो माझा वध करील.”
15एलीया म्हणाला, “ज्या सेनाधीश परमेश्वराच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ आज मी खात्रीने त्याच्या नजरेस पडेन.”
16तेव्हा ओबद्याने अहाबाची भेट घेऊन त्याला हे वर्तमान सांगितले; तेव्हा अहाब एलीयाला भेटायला गेला.
17एलीयाला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलास छळणारा तो तूच ना?”
18तो म्हणाला, “मी इस्राएलास छळले नाही; तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानायचे सोडून बआलमूर्तींच्या नादी लागून इस्राएलास छळले आहे.
19आता जासूद पाठव आणि सर्व इस्राएलास, बआलमूर्तींच्या साडेचारशे संदेष्ट्यांना आणि ईजबेलीच्या पंक्तीला जेवणार्‍या अशेरा मूर्तींच्या चारशे संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर माझ्यापुढे जमव.”
कर्मेल डोंगरावरील कसोटी
20तेव्हा अहाबाने सर्व इस्राएल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमवले.
21एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
22एलीया लोकांना म्हणाला, “परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे; बआलाचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत.
23आम्हांला दोन गोर्‍हे द्यावेत; त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोर्‍हा घ्यावा; त्याचे त्यांनी कापून तुकडे करावेत आणि ते लाकडांवर रचावेत, पण त्यांना अग्नी लावू नये; मग मीही दुसर्‍या गोर्‍ह्याचे तसेच करून तो लाकडांवर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही.
24तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.”
25एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही वाटेल तो गोर्‍हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात, तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका.”
26मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.
27दोन प्रहरी एलीयाने त्यांची थट्टा करून म्हटले, “मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकान्तात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे.”
28ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुर्‍यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले.
29दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.
30मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली.
31‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले;
32त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली.
33त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोर्‍हा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले. मग तो म्हणाला, “चार घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता.”
34तो पुन्हा म्हणाला, “दुसर्‍यांदा तसेच करा”; तेव्हा लोकांनी दुसर्‍यांदा तसेच केले. तो म्हणाला, “तिसर्‍यांदा तसेच करा”; आणि त्यांनी तिसर्‍यांदा तसेच केले.
35पाणी वेदीवरून सभोवार वाहिले, आणि ती खळगीही पाण्याने भरली.
36संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे.
37हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.”
38तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.
39हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”
40एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.
पावसासाठी एलीयाची प्रार्थना
41एलीया अहाबाला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.”
42मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.
43त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले, “काही दिसत नाही.” एलिया म्हणाला, “आणखी सात वेळा जा.”
44सातव्या खेपेस तो म्हणाला, “पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे.” एलीया म्हणाला, “अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.”
45थोड्याच वेळाने मेघ व तुफान ह्यांमुळे आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलास चालला होता.
46परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.

सध्या निवडलेले:

१ राजे 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन