YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 11:1-13

१ राजे 11:1-13 MARVBSI

शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले होते की, “तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील.” त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले. शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद ह्याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. सीदोन्यांची देवी अष्टोरेथ आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्या नादी शलमोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले; त्याचा बाप दावीद ह्याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतांना धूप दाखवत व यज्ञ करीत, त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली. शलमोनाचे मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते. त्याला ह्या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको; पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही ह्यास्तव परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केलेस त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन. पण तुझा पिता दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही; तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन. तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमेप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन.”