1 योहान 5
5
ख्रिस्तशिष्याचा विश्वास
1येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.
2आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
3देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
4कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
5येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?
6जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
7[कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत : पिता, शब्द आणि पवित्र आत्मा आणि हे तिघे एक आहेत.]
8पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेत : आत्मा, पाणी व रक्त; ह्या तिघांची साक्ष एकच आहे.
9आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे; जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे.
10जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे; ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे; कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.
11ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.
12ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.
समाप्ती
13देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे).
14त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल;
15आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
16ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.
17सर्व प्रकारची अनीती पापच आहे; तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.
18जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे; जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही.
19आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.
20आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.
21मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.
सध्या निवडलेले:
1 योहान 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.