१ करिंथ 15
15
मृतांचे पुनरुत्थान
1बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात;
2जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे,1 तीच सुवार्ता मी तुम्हांला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.2
3कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;
4तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;
5आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला.
6त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.
7त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला;
8आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.
9कारण प्रेषितांत मी कनिष्ठ आहे; प्रेषित म्हणवायला मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.
10तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केले.
11सारांश, मी असो किंवा ते असोत, आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.
12आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?
13जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;
14आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ.
15आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो; कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले; पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही.
16कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;
17आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात.
18आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे.
19आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत.
20तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.
21कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे.
22कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील;
23पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.
24नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल.
25कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.
26जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.
27कारण “त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.” परंतु “सर्व अंकित केले आहे” असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे.
28त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.1
29असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात?
30आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो?
31बंधुजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी मला तुमच्याविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की, मी रोज रोज मरतो.
32मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.”
33फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”
34नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.
35आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?”
36हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही;
37आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल;
38पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो.
39सर्व देह सारखेच नाहीत; तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा.
40तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक.
41सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्यांचे तेज निराळे; कारण तार्यातार्यांच्या तेजांत भेद आहे.
42तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते;
43जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते;
44प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.
45त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.
46तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.
47पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.
48तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत.
49आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू.
50बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
51पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;
52क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
53कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे.
54हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा
“मरण विजयात गिळले गेले आहे”
असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.
55“अरे मरणा, तुझा विजय कोठे?
अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”
56मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे;
57परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.
58म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2
सध्या निवडलेले:
१ करिंथ 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.