YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 15:42-54

१ करिंथ 15:42-54 MARVBSI

तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते; प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.