१ करिंथ 15:42-54
१ करिंथ 15:42-54 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.”
१ करिंथ 15:42-54 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते. अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते. नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे. असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे. प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे. पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता. जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत. आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू. माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही. ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ. कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे. जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”
१ करिंथ 15:42-54 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते; प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.
१ करिंथ 15:42-54 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते. जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते, भौतिक शरीर म्हणून पुरले जाते, आध्यात्मिक शरीर म्हणून उठवले जाते. अर्थात भौतिक शरीर आहे म्हणून आध्यात्मिक शरीरही असायला हवे. कारण असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी म्हणून निर्माण करण्यात आला’; परंतु शेवटचा आदाम जीवनदायक आत्मा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही. भौतिक ते प्रथम, मग आध्यात्मिक. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. जे ऐहिक आहेत, ते मातीचे आहेत आणि जे स्वर्गीय आहेत, ते जो स्वर्गातला आहे त्याच्यासारखे आहेत. जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू. बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि जे मर्त्य आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही. ऐका, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, मात्र आपण सर्व जण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, मेलेले ते अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो पूर्ण होईल.