YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 28:9-20

१ इतिहास 28:9-20 MARVBSI

हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील. सांभाळ, पवित्रस्थानाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडले आहे; हिंमत धरून हे कार्य कर.” मग दाविदाने आपला पुत्र शलमोन ह्याला मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यांवरील कोठड्या व दयासनाचे स्थान ह्यांचा नमुना दिला; त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले. त्याप्रमाणेच याजक व लेवी ह्यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसंबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवेसंबंधाच्या सर्व पात्रांचा बेत त्याने त्याला सांगून दिला; सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी सोन्याची पात्रे करण्यास सोने आणि सर्व प्रकारच्या सेवेसाठी लागणार्‍या चांदीच्या पात्रांसाठी चांदी त्याने तोलून दिली; सोन्याच्या दीपमाळा व त्यांची सोन्याची चाडी; प्रत्येक दीपमाळ व तिची चाडी ह्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे चांदी तोलून दिली. समर्पित भाकरीच्या प्रत्येक मेजासाठी सोने तोलून दिले, चांदीच्या मेजासाठी चांदी तोलून दिली. शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली. धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले, आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले. “परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.] मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.