YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 21:18-30

१ इतिहास 21:18-30 MARVBSI

तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.” गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. अर्णान मागे वळून पाहतो तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे चार पुत्र लपून राहिले. ह्या वेळी अर्णान गव्हाची मळणी करत होता. दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्णान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदाला प्रणाम केला. दावीद अर्णानास म्हणाला, “ह्या खळ्याची जागा मला दे; लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे; पुरे मोल घेऊन ही मला दे.” अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.” दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.” तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल सहाशे शेकेल सोने तोलून दिले. दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली आणि परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्याला उत्तर दिले. परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली; आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्या प्रसंगी परमेश्वराने अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला. मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती. पण दावीद देवाला प्रश्‍न विचारण्यासाठी त्याच्यापुढे जाण्यास धजेना; परमेश्वराच्या दूताच्या तलवारीचा त्याला धाक पडला होता.