नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले.
दाविदाने यवाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, “जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल.”
यवाब म्हणाला, “लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो; पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्राएलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे?”
तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला.
तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले.
त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता.
ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला.
दावीद देवाला म्हणाला, “हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकाला दोषमुक्त कर; कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”
परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद ह्याला म्हटले,
“जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो त्यांपैकी कोणती करावी ती निवड.”’
तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला सांगितले, “परमेश्वर म्हणतो, ‘पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड : तीन वर्षे दुष्काळ पडावा, अथवा तीन महिने तुझ्या शत्रूंची तलवार तुझ्यावर चालून तुझा नाश व्हावा, किंवा तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्राएली मुलखाचा नाश करावा.’ ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग.”
दावीद गादाला म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”
मग परमेश्वराने इस्राएलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले सत्तर हजार लोक पडले.
देवाने यरुशलेमाचा नाश करायला एक देवदूत पाठवला; तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले तेव्हा ह्या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणार्या देवदूताला तो म्हणाला, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान1 यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी ह्यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले, तेव्हा दावीद व वडील जन ह्यांनी दंडवत घातले; त्या वेळी त्यांनी गोणपाट नेसले होते.
दावीद देवाला म्हणाला, “लोकांची मोजदाद करण्याची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे; ह्या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा, तुझ्या लोकांवर पडून त्यांचा नाश होऊ नये.”