YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 16

16
1लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.
2दाविदाने होमबली व शांत्यर्पणे ह्यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.
3त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.
4मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले;
5प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्‍या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे;
6आणि बनाया व याहजिएल हे याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य कर्णे वाजवत असत.
दाविदाचे आभारप्रदर्शक स्तोत्र
(स्तोत्र. 105:1-15; 96:1-13; 106:47-48)
7त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव ह्यांना सांगितले; ते स्तोत्र हे : 8परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
9त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
10त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.
11परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा.
12त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा;
13त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा.
14तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत.
15त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा;
16हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली,
17ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली;
18तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन”
19त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता.
20ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले.
21त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की,
22“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
23हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.
24राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
25कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
26कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे
27तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.
28अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
29परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
30हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो; जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळत नाही.
31आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”
32समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत;
33म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे;
34परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
35असे म्हणा : “हे आमच्या तारणार्‍या देवा, आम्हांला तार; आम्हांला राष्ट्रांतून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकारस्मरण करू, आणि तुझ्या स्तवनातच आम्हांला उल्हास वाटेल.
36इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
कोशाच्या तैनातीसाठी लेव्यांची नेमणूक
37कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद ह्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहण्यासाठी नेमले;
38तसेच ओबेद-अदोम व त्याचे अडुसष्ट भाऊबंद आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम व होसा ह्यांना द्वारपाळ केले.
39आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद ह्यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर योजना केली;
40त्यांनी नित्य सकाळ-संध्याकाळ होमवेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होम अर्पावेत. अर्थात परमेश्वराने इस्राएलास विहित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्या सर्वांप्रमाणे त्यांनी करावे अशी व्यवस्था केली.
41“परमेश्वराची दया सनातन आहे” म्हणून त्याचा धन्यवाद करण्यासाठी त्याच्याबरोबर हेमान व यदूथून व इतर नावे घेऊन निवडलेले लोक होते.
42त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.
43मग सर्व लोक आपापल्या घरी गेले; आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन