त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव ह्यांना सांगितले; ते स्तोत्र हे : परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.
परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा.
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा;
त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा.
तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत.
त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा;
हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली,
ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली;
तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन”
त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता.
ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्या लोकांत हिंडले.
त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की,
“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.
राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे
तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.
अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो; जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळत नाही.
आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”
समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत;
म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे;
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
असे म्हणा : “हे आमच्या तारणार्या देवा, आम्हांला तार; आम्हांला राष्ट्रांतून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकारस्मरण करू, आणि तुझ्या स्तवनातच आम्हांला उल्हास वाटेल.
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.