उत्पत्ती 17
17
सुंता ही कराराची खूण
1अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.
2तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.”
3तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला : 4“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार.
5ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे.
6मी तुला अति फलसंपन्न करीन; तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील.
7मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.
8ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”
9देव अब्राहामाला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा.
10माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती ह्यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा : तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी.
11तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी; ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल.
12पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष आठ दिवसांचा झाला की त्याची सुंता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला, परक्यांपासून पैसे देऊन विकत घेतलेला असो.
13तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुंता अवश्य व्हावी; म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील.
14कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडला असे होईल.”
15मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल.
16मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील; तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.”
17अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, “शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय?”
18अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले.”
19मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन.
20इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे; पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणित करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्याचे मोठे राष्ट्र करीन.
21पण पुढल्या वर्षी ह्याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल; त्याच्याशीच मी आपला करार करीन.”
22मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला.
23तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल, आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास ह्यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुंता केली.
24अब्राहामाची सुंता झाली तेव्हा तो नव्व्याण्णव वर्षांचा होता.
25त्याचा मुलगा इश्माएल ह्याची सुंता झाली तेव्हा तो तेरा वर्षांचा होता.
26अब्राहाम व त्याचा मुलगा इश्माएल ह्यांची त्याच दिवशी सुंता झाली.
27आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून पैसे देऊन विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष ह्यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.
Одоогоор Сонгогдсон:
उत्पत्ती 17: MARVBSI
Тодруулга
Хуваалцах
Хувилах
Тодруулсан зүйлсээ бүх төхөөрөмждөө хадгалмаар байна уу? Бүртгүүлэх эсвэл нэвтэрнэ үү
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.