YouVersion logotips
Meklēt ikonu

योहान 1

1
प्रस्तावना
1प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
2तोच प्रारंभी देवासह होता.
3सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही.
4त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
5तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.
6देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान.
7तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.
8हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला.
9जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.
10तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.
11जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
12परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला;
13त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला.
14शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.
15त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो : “‘जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता,’ असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे.”
16त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
17कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.
18देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष
19पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे.
20त्याने कबूल केले, नाकारले नाही; “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले.
21तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्यावर त्याने “नाही” असे उत्तर दिले.
22ह्यावरून ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?”
23तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्‍याची वाणी’ मी आहे.”
24ती पाठवलेली माणसे परूश्यांपैकी होती.
25त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता?”
26योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमच्यामध्ये उभा आहे;
27जो माझ्यामागून येणारा आहे, [तो माझ्यापूर्वी होता,] त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.”
28यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.
29दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
30माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे, कारण ‘तो माझ्यापूर्वी होता’ असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे.
31मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.”
32आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
33मी तर त्याला ओळखत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’
34मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिष्य व येशू
35त्यानंतर दुसर्‍या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता,
36येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”
37त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले.
38तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?”
39तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता.
40योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
41त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे.”
42त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
43दुसर्‍या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, “माझ्या-मागून ये.”
44फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथला होता.
45फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आम्हांला सापडला आहे.”
46नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप्प त्याला म्हणाला, “येऊन पाहा.”
47नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”
48नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले.”
49नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”
50येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.”
51आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”

Pašlaik izvēlēts:

योहान 1: MARVBSI

Izceltais

Dalīties

Kopēt

None

Vai vēlies, lai tevis izceltie teksti tiktu saglabāti visās tavās ierīcēs? Reģistrējieties vai pierakstieties