लूक 3
3
बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
1तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी—ज्यावेळी पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप्प इतुरीया व त्राखोनीतीचा आणि लूसनिया अबिलेनेचा शासक होता. 2हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. 3आणि तो यार्देनेच्या आसपासच्या सर्व प्रदेशात, पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत फिरला. 4यशायाह संदेष्ट्याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे:
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.
5प्रत्येक दरी भरून जाईल,
प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील,
वाकड्या वाटा सरळ होतील,
खडतर रस्ते सुरळीत होतील.
6आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”#3:6 यश 40:3‑5
7त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? 8पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. ‘आमचा पिता तर अब्राहाम आहे,’ असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. 9कुर्हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
10यावर समुदायाने त्याला विचारले, “तर मग आम्ही काय करावे?”
11यावर योहानाने उत्तर दिले, “तुमच्याजवळ दोन अंगरखे असतील, तर ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा, तुमच्याजवळ अन्न असेल, तर त्यांनीही तसेच करावे.”
12जकातदारही#3:12 जकातदारही जे लोकांकडून कर गोळा करीत असत बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13योहानाने उत्तर दिले, “जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका.”
14काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले.
“धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”
15लोक अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात आश्चर्य करीत होते की कदाचित योहानच ख्रिस्त असले पाहिजे. 16योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. 17खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.” 18दुसर्या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली.
19योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी िववाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या, 20या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
येशूंचा बाप्तिस्मा
21जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला, 22आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
23येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत.
योसेफ हा एलीचा पुत्र होता. 24एली हा मत्ताथाचा पुत्र,
तो लेवीचा पुत्र, तो मल्खीचा पुत्र,
तो यन्नयाचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र,
25तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो आमोसाचा पुत्र,
तो नहुमाचा पुत्र, तो हेस्लीचा पुत्र,
तो नग्गयाचा पुत्र, 26तो महथाचा पुत्र,
तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो शिमयीचा पुत्र,
तो योसेखाचा पुत्र, तो योदाचा पुत्र,
27तो योहानाचा पुत्र, तो रेशाचा पुत्र,
तो जरूब्बाबेलाचा पुत्र, तो शल्तीएलचा पुत्र,
तो नेरीचा पुत्र, 28तो मल्खीचा पुत्र,
तो अद्दीचा पुत्र, तो कोसामाचा पुत्र,
तो एल्मदामाचा पुत्र, तो एराचा पुत्र,
29तो यहोशुआचा पुत्र, तो एलिएजराचा पुत्र,
तो योरिमाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र,
तो लेवीचा पुत्र, 30तो शिमोनाचा पुत्र,
तो यहूदाहचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र,
तो योनामाचा पुत्र, तो एल्याकीमचा पुत्र,
31तो मल्याचा पुत्र, तो मिन्नाचा पुत्र,
तो मत्ताथाचा पुत्र, तो नाथानाचा पुत्र,
तो दावीदाचा पुत्र, 32तो इशायाचा पुत्र,
तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र,
तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,
33तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र,
तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा,
तो यहूदाहचा, 34तो याकोबाचा पुत्र,
तो इसहाकाचा पुत्र, तो अब्राहामाचा पुत्र,
तो तेरहाचा पुत्र, तो नाहोराचा पुत्र,
35तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र,
तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र,
तो शेलहाचा पुत्र, 36तो केनानाचा पुत्र,
तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र,
तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,
37तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र,
तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र,
तो केनानाचा पुत्र, 38तो एनोशाचा पुत्र,
तो शेथाचा पुत्र, तो आदामाचा पुत्र,
तो परमेश्वराचा पुत्र होता.
Šiuo metu pasirinkta:
लूक 3: MRCV
Paryškinti
Dalintis
Kopijuoti

Norite, kad paryškinimai būtų įrašyti visuose jūsų įrenginiuose? Prisijunkite arba registruokitės
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.