लूक 19
19
जकातदार जक्कय
1येशू यरीहोत प्रवेश करून त्यातून जात होते, 2तिथे जक्कय नावाचा एक मनुष्य होता; तो प्रमुख जकातदार होता आणि श्रीमंत होता. 3येशू कोण आहे हे पाहण्याची त्याची उत्कट इच्छा होती, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे गर्दीतून पाहणे त्याला शक्य नव्हते. 4तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.
5येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.” 6तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
7सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे.”
8पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो.”
9येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे. 10मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.”
दहा मीना यांचा दाखला
11ते ऐकत असतानाच, येशूंनी त्यांना पुढे एक दाखला सांगितला, कारण ते यरुशलेमजवळ होते आणि लोकांना असे वाटले की परमेश्वराचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे. 12येशू म्हणाले, “प्रतिष्ठित समाजातील एक मनुष्य राजा म्हणून नियुक्त करून घेण्यासाठी दूर देशी गेला आणि परत येणार होता. 13त्याने आपल्या दहा दासांना बोलाविले व त्यांना दहा मीना#19:13 एक मीना सुमारे तीन महिन्यांचे वेतन दिल्या व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’
14“परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’
15“तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलाविले.
16“पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’
17“त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या दासा! अतिशय थोडक्या बाबतीत तू विश्वासू राहिलास, म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी घे.’
18“नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’
19“त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’
20“मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती, 21तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’
22“यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो, 23तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’
24“नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’
25“पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’
26“यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’ 27आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”
येशू यरुशलेमात राजा म्हणून येतात
28हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. 29जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की: 30“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा. 31‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”
32ज्यांना पुढे पाठविले होते, ते तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले. 33ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?”
34त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला याची गरज आहे.”
35त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसविले. 36जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले.
37जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:
38“प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!”#19:38 स्तोत्र 118:26
“स्वर्गात शांती आणि परमोच्चस्थानी गौरव!”
39गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”
40पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.”
41जसे ते यरुशलेमजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले, 42“जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत. 43कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील. 44ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.”
येशू मंदिरात येतात
45नंतर येशू मंदिराच्या अंगणात आले आणि तिथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले. 46ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’#19:46 यश 56:7 पण तुम्ही ते ‘एक लुटारूंची गुहा केली आहे.’#19:46 यिर्म 7:11”
47त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते. 48परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.
Šiuo metu pasirinkta:
लूक 19: MRCV
Paryškinti
Dalintis
Kopijuoti
Norite, kad paryškinimai būtų įrašyti visuose jūsų įrenginiuose? Prisijunkite arba registruokitės
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.