लूक 18
18
अत्याग्रही विधवा
1त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला.
2तो म्हणाला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे;
3आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’
4पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही,
5तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.”’
6तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.
7तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?
8मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
परूशी व जकातदार
9आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा :
10“एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले.
11परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.
12मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’
13जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’
14मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
लहान मुलांना येशूचा आशीर्वाद
15नंतर लोकांनी आपली तान्ही बालकेही त्याने त्यांना स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले.
16येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
17मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.”
शाश्वत जीवन व धनाची आडकाठी
18कोणाएका अधिकार्याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”
19येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही.
20तुला आज्ञा ठाऊक आहेत : ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’
21तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”
22हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”
23पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
24तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे!
25श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
26ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
27तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
28तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”
29त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,
30त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
येशूचे आपल्या मृत्यूविषयीचे तिसरे भविष्य
31तेव्हा त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत.
32म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील,
33त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसर्या दिवशी पुन्हा उठेल.”
34त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.
येशूचे एका आंधळ्याला दृष्टिदान
35तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की, एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता.
36त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?”
37त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.”
38तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
39तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
40तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले,
41“मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.”
42येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
Currently Selected:
लूक 18: MARVBSI
Tya elembo
Share
Copy
Olingi kobomba makomi na yo wapi otye elembo na baapareyi na yo nyonso? Kota to mpe Komisa nkombo
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.