योहान 4

4
येशूचे शोमरोनी स्त्रीबरोबर संभाषण
1येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहेत असे परूश्यांच्या कानावर गेले आहे असे येशूंना समजले— 2वास्तविक पाहता येशू बाप्तिस्मा देत नव्हते, परंतु त्यांचे शिष्यच बाप्तिस्मा देत असत. 3तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले.
4त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले. 5मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते. 6तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.
7तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?” 8त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते.
9तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध#4:9 अर्थात् शोमरोनी लोकांनी वापरलेले भांडे वापरत नाही ठेवीत नसत.)
10येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”
11“महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार? 12आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”
13येशूंनी तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, 14परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”
15ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.”
16येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”
17परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”
त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. 18कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”
19“महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते. 20आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.”
21येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही. 22तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे. 23अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे. 24परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”
25ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.”
26यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”
शिष्य येशूंकडे परत येतात
27त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
28मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली, 29“चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?” 30तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.
31“गुरुजी, आपण काही खावे,” म्हणून शिष्य त्यांना आग्रह करू लागले.
32पण ते त्यांना म्हणाले, “माझ्याजवळ असे अन्न आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही.”
33त्यावर शिष्य एकमेकांना विचारू लागले, “यांना कोणी अन्न आणून दिले का?”
34येशूंनी म्हटले, “ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न. 35‘चार महिन्यांचा अवधी कापणी करण्यासाठी आहे असे तुमचे म्हणणे आहे ना?’ तर मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा! ती कापणीसाठी तयार आहेत. 36आता कापणार्‍याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्‍याने व कापणार्‍यानेही एकत्रित मिळून आनंद करावा. 37‘एक पेरतो व दुसरा कापणी करतो,’ अशी जी म्हण आहे ती खरी आहे. 38जिथे तुम्ही पेरणी केली नाही, तिथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.”
अनेक शोमरोनी विश्वास ठेवतात
39“मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली,” या तिच्या साक्षीवरून शोमरोन नगरातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 40म्हणून शोमरोनी लोक येशूंकडे आल्यावर त्यांनी येशूंना नगरात राहण्याची विनंती केली. तेव्हा ते तिथे दोन दिवस राहिले. 41याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.
42मग ते त्या बाईला म्हणाले, “तू सांगितले म्हणून नव्हे, तर आम्ही प्रत्यक्ष त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्हाला माहीत आहे की हा मनुष्य खरोखर जगाचा तारणारा आहे.”
येशू अंमलदाराच्या मुलाला बरे करतात
43दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले. 44कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. 45ते गालीलात आले, तेव्हा गालिलकरांनी त्यांचे स्वागत केले. कारण वल्हांडण सणाच्या वेळी, ते तिथे उपस्थित होते व यरुशलेममध्ये जे काही येशूंनी केले ते त्यांनी पाहिले होते.
46गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता. 47येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता.
48तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.”
49तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.”
50येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.”
त्या मनुष्याने येशूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि निघाला. 51तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली. 52मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.”
53तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला.
54येशूंनी यहूदीयातून गालीलात आल्यानंतर हे दुसरे चिन्ह केले होते.

ハイライト

シェア

コピー

None

すべてのデバイスで、ハイライト箇所を保存したいですか? サインアップまたはサインインしてください。