लूक 15
15
हरवलेल्या मेंढराचा दाखला
1आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. 2हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”
3त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: 4“समजा, एकाजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातून एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय? 5ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल 6आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ 7त्याचप्रमाणे मी सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.
हरवलेल्या नाण्याचा दाखला
8“एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी#15:8 ग्रीक दहा नाणी द्रह्मा चांदीची एक नाणी, एक द्रह्मा दिनार म्हणजे एका दिवसाची मजुरी. असून त्यातले एक हरवले, तर दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय? 9ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”
हरवलेल्या पुत्राचा दाखला
11येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते. 12त्यातला धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली.
13“काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला तेथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला. 14सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला गरज भासू लागली. 15तेव्हा तो गेला आणि स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. 16शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.
17“शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या बापाच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. 18मी आता माझ्या बापाकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’ 20तेव्हा तो उठला आपल्या बापाकडे निघाला.
“तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.
21“मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’
22“परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला. 23खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू. 24कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.
25“तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले. 26तेव्हा त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ 27यावर त्याला सांगण्यात आले, ‘तुझा भाऊ परत आला आहे. तो सुखरुपपणे घरी आला म्हणून तुमच्या वडिलांनी एक पोसलेले वासरू कापले आहे!’
28“हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले. 29परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘बाबा, मी इतकी वर्षे सेवा केली आणि तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी तुम्ही आजपर्यंत मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून एक करडूही दिले नाही. 30पण आता हा तुमचा पुत्र आपली सारी संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’
31“यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. 32हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”
Jelenleg kiválasztva:
लूक 15: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.