मत्तय 23
23
शास्त्री व परुशी ह्यांचा निषेध
1नंतर येशू लोकसमुदायाला व त्याच्या शिष्यांना म्हणाला, 2“शास्त्री व परुशी मोशेच्या आसनावर बसले आहेत. 3म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतात, ते सर्व पाळा व करा, परंतु ते वागतात तसे तुम्ही वागू नका, कारण ते सांगतात तसे ते स्वतः करत नाहीत. 4जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत. 5ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात. 6मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे, 7बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून ‘गुरुजी, गुरुजी’, म्हणवून घेणे त्यांना आवडते. 8तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात. 9पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. 10तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय. 11उलट, तुमच्यामध्ये जो सर्वांत थोर असेल, त्याने तुमचा सेवक व्हावे. 12जो कोणी स्वतःला उच्च करील त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करील त्याला उच्च केले जाईल.
13अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतः आत जात नाही व जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही. 14[अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]
15अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही एक शिष्य मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या दुप्पट असा नरकपुत्र बनवता.
16अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता की, कोणी मंदिराची शपथ घेतली, तर त्यात काही वावगे नाही. परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर मात्र ती त्याला बंधनकारक ठरते. 17अहो मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? ते सोने की ज्याच्यामुळे ते पवित्र झाले ते मंदिर? 18तुम्ही म्हणता की, कोणी वेदीची शपथ घेतली, तर त्यात काही अयोग्य नाही. परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर ती त्याला बंधनकारक ठरते. 19अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी? 20म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो. 21जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो. 22जो स्वर्गाची शपथ घेतो, तो परमेश्वराच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो.
23अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या. 24अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता!
25अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे. 26अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल.
27अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात. 28तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.
29अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता 30आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ 31ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता. 32तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा. 33अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? 34पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल. 35म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल. 36मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल.
यरुशलेमविषयी येशूची आस्था
37यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या नगरी, तुझ्याकडे पाठवलेल्यांवर धोंडमार करणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची माझी कितीदा तरी इच्छा होती. पण तू मला तसे करू दिले नाहीस. 38पाहा, तुमचे घर तुम्हांला सोडून द्यावे लागेल आणि ते ओस पडेल. 39कारण मी तुम्हांला सांगतो, आतापासून पुढे, “जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य’ असे तुम्ही म्हणू लागाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
Jelenleg kiválasztva:
मत्तय 23: MACLBSI
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.