मत्तय 1
1
येशू ख्रिस्ताचे पूर्वज
1अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी:
2-5अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.
6-11दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.
12-16बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती.
17अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म
18येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. 19तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला. 20असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे. 21तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”
22हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे भाकीत केले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:
23पाहा, कुमारी गर्भवती होईल
व तिला पुत्र होईल
आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’
असा आहे.
24झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला. 25मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.
Chwazi Kounye ya:
मत्तय 1: MACLBSI
Pati Souliye
Pataje
Kopye
Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.