योहान 1

1
शब्द मनुष्य झाला!
1प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2तोच प्रारंभी देवासह होता. 3सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही. 4त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. 5तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.
6देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते. 7तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. 8तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता.
9जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. 10तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. 11तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. 12मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 13त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.
14शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.
15त्याच्याविषयी योहानने साक्ष दिली आणि आवेशाने म्हटले, “‘जो माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पुढचा आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हा आहे.”
16त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 17नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. 18देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानची येशूविषयी साक्ष
19यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः
20त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, तर स्पष्ट म्हटले, “मी ख्रिस्त नाही.”
21त्यांनी त्याला विचारले, “मग कोण? आपण एलिया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो संदेष्टा आपण आहात काय?” त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही.”
22तेव्हा ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे आम्हांला सांगा. आपले स्वतःविषयी काय म्हणणे आहे?”
23त्याने उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे “परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”
24ही माणसे परुशी लोकांनी पाठवली होती. 25त्यांनी त्यानंतर योहानला विचारले, “आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत व संदेष्टाही नाहीत, तर मग आपण बाप्तिस्मा का देता?”
26योहानने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा देतो. परंतु ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुमच्यात उभा आहे. 27तो माझ्यानंतर येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.”
28यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे योहान बाप्तिस्मा देत होता. तेथे ह्या गोष्टी घडल्या.
29दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू! 30“जो माझ्यानंतर येत आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हा आहे. 31मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएली लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो आहे.”
32योहानने अशी साक्ष दिली, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. 33मी तर त्याला ओळखत नव्हतो परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा द्यायला पाठवले, त्याने मला सांगितले, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना तू पाहशील, तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा आहे.’ 34मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिष्य व येशू
35दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा होता 36आणि येशूला बाजूने चालत जाताना पाहून तो म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!”
37त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेले. 38येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी (म्हणजे गुरुवर्य), आपण कोठे राहता?”
39तो त्यांना म्हणाला, “या आणि पाहा.” ती दुपारची वेळ होती. त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या बरोबर राहिले.
40योहानचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. 41त्याने त्याचा भाऊ शिमोन ह्याची लगेच भेट घेतली आणि त्याला सांगितले, “आम्हांला मसिहा (म्हणजे ख्रिस्त) भेटला आहे.” 42नंतर अंद्रियाने शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहत म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस, परंतु तुला केफा म्हणजेच पेत्र म्हणतील.”
43दुसऱ्या दिवशी येशूने गालीलमध्ये जायचे ठरवले तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” 44फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथील होता. 45फिलिपला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात व संदेष्ट्यांनीसुद्धा लिहिले आहे, तो म्हणजे योसेफचा मुलगा, नासरेथकर येशू आम्हांला भेटला आहे.”
46नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी चांगले निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “ये आणि पाहा.”
47नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!”
48नथनेलने येशूला विचारले, “आपण मला कसे काय ओळखता?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले.”
49नथनेल त्याला म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.”
50येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले, असे सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा महान गोष्टी तू पाहशील.” 51आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte

Plan lekti ak devosyon gratis yo ki gen rapò ak योहान 1

YouVersion sèvi ak cookies pou pèsonalize eksperyans ou. Lè w sèvi ak sit entènèt nou an, ou aksepte itilizasyon cookies yo jan sa dekri nan Règleman sou enfòmasyon privenou an