उत्पत्ती 8

8
जलप्रलयाचा शेवट
1मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;
2जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली,
3पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले.
4सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले.
5दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले.
6ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली, 7आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला.
8पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले.
9त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले.
10त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले.
11सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे.
12त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही.
13सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले.
14दुसर्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाळली.
15मग देव नोहाला म्हणाला,
16“तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ.
17पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”
18तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना ह्यांना घेऊन बाहेर निघाला.
19प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले.
20नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.
21परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.
22पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत.”

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte