YouVersion Logo
Search Icon

जखर्‍याह 9

9
इस्राएलच्या शत्रूवर दंडाज्ञा
1ही एक भविष्यवाणी आहे:
हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले,
आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल;
कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी
याहवेहवर लागलेली आहे;#9:1 किंवा याहवेहची नजर इस्राएलच्या सर्व कुळांवर आहे
2सोर व सीदोनवर,
आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.
3सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत;
तिने रुपे धुळीच्या
व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.
4परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील
आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील,
आणि ती अग्नीत भस्म होईल.
5अष्कलोन हे पाहून भयभीत होईल;
गाझा वेदनेने कळवळेल,
व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल.
गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल
आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.
6मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील,
आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन.
7मी त्यांच्या मुखातून रक्त व
त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन.
जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील
आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील
पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील.
8परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी
मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन.
यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत,
आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन.
सीयोनच्या राजाचे आगमन
9सीयोनकन्ये, फार आनंद कर!
यरुशलेमकन्ये, गर्जना कर!
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,
तो नीतिमान व विजयी आहे,
तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे
होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
10मी एफ्राईमचे रथ
आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन,
आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील.
आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल.
त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत
आणि फरात#9:10 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.
11तुमच्या बाबत बोलायचे तर,
रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे,
मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे.
12अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या;
आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.
13यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो
आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन.
अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना
हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन,
आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.
याहवेहचे दर्शन होईल
14मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील;
त्यांचे बाण विजेसारखे चमकतील.
सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील;
ते दक्षिणेतील वादळातून चालतील,
15आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील.
ते नष्ट करतील,
आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील.
ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील;
ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि
वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील.
16त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो,
त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील.
मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे
ते त्यांच्या देशात चमकतील.
17ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील!
धान्य तरुणांची
आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in