लूक 9
9
येशू बारा प्रेषितांना पाठवितात
1जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. 2नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्यांना बरे करण्यास पाठविले. 3येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना काठी, झोळी, अन्न किंवा पैसे, अतिरिक्त अंगरखा असे काहीही घेऊ नका, 4एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तिथेच राहा. 5जर एखाद्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही, तर त्या गावातून बाहेर पडा आणि तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.” 6त्याप्रमाणे शिष्य शुभवार्ता गाजवीत आणि सर्वत्र आजार्यांना बरे करीत गावोगाव फिरू लागले.
7येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.” 8आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते. 9पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा मनुष्य कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला.
येशू पाच हजारांना जेवू घालतात
10नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी गेले. 11परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले.
12दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”
13त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तरच हे शक्य आहे” 14तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती.
येशू शिष्यांना म्हणाले, “अंदाजे पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसावयास सांगा.” 15तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले. 16येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. 17ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या.
येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राची कबुली
18एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?”
19ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.”
20“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.”
येशू स्वतःच्या मृत्यूबद्दल भविष्य सांगतात
21येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. 22ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःखे सहन करावी आणि वडीलजन व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.”
23नंतर ते सर्वांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. 24कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. 25कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 26ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, तर जेव्हा मानवपुत्र पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईन तेव्हा त्यालाही त्याची लाज वाटेल.
27“मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”
येशूंचे रूपांतर
28या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूंनी बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. 29येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली. 30मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. 31आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्या प्रयाणासंबंधाने#9:31 ग्रीक निर्गम बोलत होते. 32यावेळी पेत्र आणि इतर दोन शिष्यांना अतिशय झोप आली होती, परंतु जागे झाल्यानंतर त्यांनी येशूंचे वैभव पाहिले आणि दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे असलेले पाहिले. 33मग मोशे व एलीयाह येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते.
34पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले. 35मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.” 36ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.
दुरात्म्याने पछाडलेल्या मुलास बरे करणे
37दुसर्या दिवशी जेव्हा ते डोंगरावरून खाली उतरले, त्यावेळी येशूंना एक मोठा समुदाय येऊन भेटला 38गर्दीतील एक मनुष्य येशूंना हाक मारून म्हणाला, “गुरुजी, मी तुमच्याजवळ विनंती करतो की माझ्या एकुलत्या एका पुत्राला आपण पाहावे, 39एक दुरात्मा याला धरून ठेवतो आणि तो एकाएकी किंचाळू लागतो; हा आत्मा त्याला पिळून काढतो व मुलाच्या तोंडाला फेस येतो. तो त्याला फार ठेचतो, जखमा करतो व त्याचा नाश करावयास पाहतो. 40या दुरात्म्याला बाहेर काढावे अशी मी तुमच्या शिष्यांना विनंती केली की, परंतु ते काढू शकले नाहीत.”
41येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, मी किती वेळ तुमच्याबरोबर राहू व तुमचे सहन करू? मुलाला इकडे घेऊन या.”
42मुलगा येशूंकडे येत असताना, अशुद्ध आत्म्याने त्याला जमिनीवर आपटले व त्याला झटके आले. परंतु येशूंनी दुरात्म्याला धमकावून त्या मुलाला बरे केले व वडिलांच्या स्वाधीन केले. 43परमेश्वराच्या शक्तीचे हे प्रात्यक्षिक पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
पुन्हा एकदा येशूंचे मृत्यूबद्दल भविष्य
येशू करीत असलेल्या चमत्कारांच्या गोष्टींविषयी लोक आश्चर्य व्यक्त करीत असतानाच, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, 44“मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.” 45परंतु ते काय म्हणतात हे त्यांना समजले नाही. त्याचे आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि या गोष्टींविषयी त्यास विचारण्याची त्यांना भीती वाटली.
46आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला. 47पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून, 48ते शिष्यांना म्हणाले, “जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो मला पाठविणार्याचा स्वीकार करतो. जो तुम्हामध्ये सर्वात कनिष्ठ आहे तोच थोर आहे.”
49योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
50येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”
शोमरोनी लोकांचा विरोध
51येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले. 52मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले. 53परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते. 54जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”#9:54 काही मूळ प्रतींमध्ये जसे एलीयाहने केले 55परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले. 56नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्या गावाकडे निघून गेले.
येशूंना अनुसरण्यासाठी द्यावी लागणारी किंमत
57ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”
58येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”
59आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.”
परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
60येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.”
61आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.”
62पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”
Currently Selected:
लूक 9: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.