YouVersion Logo
Search Icon

लूक 4

4
येशूंची परीक्षा
1पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले, 2तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली.#4:2 ग्रीक यासाठी परीक्षा याचा अर्थ मोहात पाडणे किंवा कसोटी असा होतो. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.
3सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”
4पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”#4:4 अनु 8:3
5नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. 6आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. 7जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.”
8येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”#4:8 अनु 6:13
9मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,” 10कारण असे लिहिले आहे:
“ ‘तुझे रक्षण व्हावे
म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल;
11तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये,
म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ”#4:11 स्तोत्र 91:11, 12
12येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”#4:12 अनु 6:16
13या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला.
येशूंना नासरेथ येथे नाकारण्यात येते
14यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली. 15ते त्यांच्या सभागृहांमध्ये शिक्षण देत होते आणि प्रत्येकाने त्यांची स्तुती केली.
16ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले. 17यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:
18“परमेश्वराचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
प्रभूने माझा अभिषेक केला आहे.
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी,
अंधांना दृष्टी देण्यासाठी,
त्यांनी मला पाठविले आहे.
19प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”#4:19 यश 61:1, 2 यश 58:6
20नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती. 21येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”
22सर्व लोक त्यांच्याबद्दल चांगले बोलले आणि कृपेची वचने त्यांच्या मुखातून बाहेर पडली हे ऐकून विस्मित झाले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र आहे ना?”
23येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मला ही म्हण लागू कराल: अरे ‘वैद्या, तू स्वतःलाच बरे कर!’ आणि तुम्ही मला म्हणाल, ‘ज्याकाही गोष्टी तुम्ही कफर्णहूम या गावात केल्या त्याविषयी आम्ही ऐकले आहे, त्या गोष्टी येथे स्वतःच्या गावात करा.’ ”
24“पण मी तुम्हाला निश्चित सांगतो,” ते पुढे म्हणाले, “संदेष्ट्याला स्वतःच्या गावी सन्मान मिळत नाही. 25हे मी खात्रीपूर्वक सांगतो, जेव्हा साडेतीन वर्षे आकाश बंद झाले व सर्व देशभर भयंकर दुष्काळ पडला होता, त्यावेळी इस्राएलमध्ये एलीयाहच्या काळात अनेक विधवा होत्या. 26तरीही एलीयाहला कोणाकडे पाठविले नाही, पण सीदोन प्रदेशातील सारफथ येथील विधवेकडे पाठविले. 27आणि त्याचप्रमाणे संदेष्टा अलीशाच्या काळात इस्राएलमध्ये अनेक कुष्ठरोगी#4:27 कुष्ठरोग हा शब्द कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी वापरला जात असे होते पण त्यांच्यापैकी कोणी शुद्ध झाला नाही—केवळ सिरिया देशातील नामान.”
28जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा सभागृहातील सर्व लोक संतप्त झाले. 29ते उठले, त्याला नगराबाहेर घालविले व ज्या टेकडीवर ते शहर वसले होते, त्या टेकडीच्या कड्यावरून ढकलून देण्यासाठी घेऊन आले. 30पण ते भरगर्दीतून चालतच त्यांच्या मार्गाने निघून गेले.
येशू अशुद्ध आत्म्यास काढून टाकतात
31नंतर येशू खाली गालील प्रांतातील कफर्णहूम येथे गेले आणि शब्बाथ दिवशी लोकांना शिकवू लागले. 32येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता.
33सभागृहामध्ये भुताने पछाडलेला, अशुद्ध आत्मा लागलेला, एक मनुष्य होता तो उच्चस्वराने म्हणाला, 34“नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”
35“गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” मग त्या भुताने त्या मनुष्याला सर्वांसमोर खाली पाडले आणि त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून गेला.
36सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे! काय हा अधिकार आणि त्यांच्या शक्तीने ते अशुद्ध आत्म्यांना आदेश देतात व ते बाहेर येतात!” 37त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली.
येशू पुष्कळांना बरे करतात
38येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले. 39त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.
40सूर्यास्ताच्या वेळी, लोकांनी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते त्या सर्वांना येशूंकडे आणले आणि त्यांनी त्या प्रत्येकावर हात ठेऊन त्यांना बरे केले. 41याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते.
42पहाटेच, येशू एकांतस्थळी गेले. लोक त्यांना शोधीत जिथे ते होते तिथे गेले. तेव्हा येशू त्यांना सोडून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. 43पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्‍या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” 44आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले.

Currently Selected:

लूक 4: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in