लूक 13
13
पश्चात्ताप करा किंवा नाश पावा
1त्या सुमारास तिथे जे हजर होते, त्यांनी असे वृत्त येशूंना सांगितले की, गालील येथील रहिवाशांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानांमध्ये मिश्रित केले होते. 2येशूंनी उत्तर दिले, “गालीलातील लोक इतर लोकांपेक्षा अधिक पापी होते म्हणून त्यांनी दुःख सोसले असे तुम्हाला वाटते काय? 3मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. 4किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते? 5नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”
6नंतर त्यांनी हा दाखला सांगितला: “एका मनुष्याच्या बागेमध्ये अंजिराचे झाड वाढत होते, आणि तो फळ पाहावयास गेला पण त्याला काही सापडले नाही. 7जो मळ्याची काळजी घेत होता त्यास म्हणाला, ‘तीन वर्षापासून मी या अंजिराच्या झाडावर फळ शोधायला येत आहे आणि मला काहीच मिळाले नाही. ते उपटून टाक! या जागेचा व्यर्थ उपयोग का बरे?’
8“त्यावर माळी धन्याला म्हणाला, ‘आणखी एक वर्ष राहू द्या, मी त्याच्याभोवती खोदून खतपाणी घालेन. 9पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ”
शब्बाथ दिवशी येशू एका अपंग स्त्रीस बरे करतात
10एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते, 11तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. 12येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” 13त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.
14येशूंनी शब्बाथ दिवशी बरे केले हे पाहून सभागृहाचा प्रमुख खूपच संतप्त झाला व लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत; त्या दिवसातच आजारातून बरे होण्यासाठी येत जा; शब्बाथ दिवशी नाही.”
15प्रभूने त्यांना उत्तर दिले, “ढोंग्यांनो! तुमच्यातील कोणी शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून बाहेर पाणी पाजण्यास नेत नाहीत काय? 16ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील#13:16 वंशातील म्हणजे अब्राहामाच्या वंशातील कन्या, इस्राएल जातीचे यहूदी कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?”
17येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले.
मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दाखला
18नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? 19एका मनुष्याने आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.”
20पुन्हा येशूंनी विचारले, “परमेश्वराच्या राज्याची तुलना मी कशाबरोबर करू? 21ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप#13:21 अंदाजे 27 कि.ग्रॅ. पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.”
अरुंद प्रवेशद्वार
22नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले. 23त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?”
येशू त्यांना म्हणाले, 24“अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत. 25एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’
“तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’
26“पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’
27“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’
28“अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल. 29पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील. 30खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
येशूंचा यरुशलेमसाठी शोक
31काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.”
32येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’ 33काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही.
34“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. 35आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने#13:35 स्तोत्र 118:26 येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”
Currently Selected:
लूक 13: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.