YouVersion Logo
Search Icon

योहान 8

8
1नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले.
2अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले. 3नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले 4आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे. 5मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?” 6ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते.
परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले. 7ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.” 8मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले.
9ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती. 10मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?”
11ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!”
येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.”
येशूंच्या साक्षीवरून वाद
12येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
13यावर परूशी त्यांना आव्हान देत म्हणाले, “येथे आपण, आपल्या स्वतःविषयी साक्ष देता; म्हणून तुमची साक्ष सबळ वाटत नाही.”
14येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो, तरी माझी साक्ष सबळ आहे, कारण मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, हे मला माहीत आहे. परंतु मी कुठून येतो व मी कुठे जातो याची तुम्हाला काही कल्पना नाही. 15तुम्ही मानवी मापदंडाने न्याय करता; परंतु मी कोणाचाही न्याय करीत नाही. 16मी न्याय केलाच, तर माझे निर्णय खरे आहेत, कारण मी एकटाच नाही, तर ज्या पित्याने मला पाठविले तेही माझ्याबरोबर असतात. 17तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की दोन साक्षीदारांची साक्ष खरी मानावी. 18मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठविले ते माझे दुसरे साक्षीदार आहेत.”
19तेव्हा त्यांनी विचारले, “तुझा पिता कुठे आहे?”
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी व माझा पिता कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20मंदिराच्या अंगणाच्या जवळ जिथे दानार्पण टाकीत असत तिथे शिकवीत असताना ते ही वचने बोलले, तरीसुद्धा त्यांना कोणीही धरले नाही, कारण त्यांची वेळ तेव्हापर्यंत आली नव्हती.
ख्रिस्त कोण आहे यावर वाद
21मग पुन्हा येशू त्यांना म्हणाले, “मी जाणार आहे आणि तुम्ही माझा शोध कराल व तुमच्या पापात मराल. मी जिथे जाणार तिथे तुम्हाला येता येणार नाही.”
22यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?”
23परंतु ते पुढे म्हणाले, “तुम्ही खालचे आहात; मी तर वरून आहे. तुम्ही या जगाचे आहात; तसा मी या जगाचा नाही. 24मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”
25त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?”
येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे, 26मला तुमचा न्याय करण्याबाबत बरेच काही बोलायचे आहे. परंतु ज्यांनी मला पाठविले, ते विश्वसनीय आहेत आणि जे मी त्यांच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.”
27परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते. 28म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल,#8:28 किंवा उच्च करणे तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्यागोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल. 29ज्याने मला पाठविले; ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला एकटे सोडले नाही, कारण त्यांना जे आवडते ते मी नेहमी करत असतो.” 30हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
येशूंच्या विरोधकांची मुले यावर वाद
31ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. 32मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल.”
33त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”
34त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. 35आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो. 36म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल. 37मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही. 38मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.”
39त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.”
येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता तर तुम्ही अब्राहामाची#8:39 काही मूळ प्रतींमध्ये येशू म्हणाला, जर तुम्ही अब्राहामाचे लेकरे आहात तर, कृत्ये केली असती. 40परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते. 41तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.”
तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.”
42येशूंनी त्यांना म्हटले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे. 43मी म्हणतो ते तुम्हाला समजत नाही कारण ते तुम्ही ऐकू इच्छित नाहीत. 44तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे. 45पण मी सत्य सांगतो तर तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही! 46मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही? 47जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”
येशूंची स्वतःविषयीची साक्ष
48यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”
49येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. 50मी स्वतःचे गौरव करू इच्छित नाही; पण एकजण ते इच्छितो आणि तो न्यायाधीश आहे. 51मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”
52यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही. 53आमचा पिता अब्राहाम त्यापेक्षा तू थोर आहेस काय? तो मरण पावला आणि संदेष्टेही. तू कोण आहेस असे तुला वाटते?”
54तेव्हा येशूंनी त्यांना सांगितले, “मी स्वतः आपले गौरव केले, तर ते व्यर्थ आहे. परंतु माझा गौरव करणारे माझे पिता आहेत आणि त्यानांच तुम्ही आपला परमेश्वर मानता. 55तुम्ही त्यांना ओळखत नाही, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना ओळखत नाही असे म्हटले असते, तर मी तुमच्यासारखाच लबाड ठरलो असतो; परंतु मी त्यांना ओळखतो व त्यांचे वचन पाळतो. 56तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या विचाराने उत्सुक झाला होता; व तो पाहून त्याला आनंद झाला.”
57तेव्हा यहूदी पुढारी त्याला म्हणाले, “तुझे वय पन्नास वर्षाचे देखील नाही आणि तू अब्राहामाला पाहिले!”
58येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की अब्राहाम जन्मला नव्हता, त्यापूर्वी मी आहे!” 59हे ऐकल्याबरोबर त्यांनी येशूंना मारण्यासाठी दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यापासून लपून मंदिराच्या आवारातून निघून गेले.

Currently Selected:

योहान 8: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Free Reading Plans and Devotionals related to योहान 8

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy