Λογότυπο YouVersion
Εικονίδιο αναζήτησης

लूक 14

14
येशू परूश्याच्या घरी
1एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते. 2तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता. 3परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?” 4परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.
5नंतर ते म्हणाले, “जर तुमचे लहान लेकरू#14:5 काही मूळ प्रतींमध्ये गाढव किंवा बैल शब्बाथ दिवशी विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही का?” 6पण ते काहीच बोलले नाही.
7पाहुणे पंक्तीत मानाच्या जागा पटकावण्याच्या खटपटीत असलेले पाहून त्यांनी त्यास दाखला सांगितला 8“तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिले, तर मानाची जागा घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा अधिक आदरणीय व्यक्तीस आमंत्रण दिले असेल 9तर आमंत्रण देणारा, ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल, ‘या गृहस्थांना या जागेवर बसू द्या.’ तेव्हा तुमचा अपमान होईल व कमी प्रतीच्या जागेवर जाऊन बसावे लागेल. 10परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्‍या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल. 11कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.”
12नंतर येशू यजमानास म्हणाले, “जेव्हा तुम्ही दुपारी व संध्याकाळी मेजवानी देता, त्यावेळी तुमचे मित्र, भाऊ किंवा बहीण, नातेवाईक आणि श्रीमंत शेजारी यांना आमंत्रण देऊ नका, जर तुम्ही तसे कराल तर ते तुमच्या आमंत्रणाची परतफेड करतील. 13तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या. 14म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”
मोठ्या मेजवानीचा दाखला
15येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करेल.”
16येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली. 17मेजवानीच्या वेळेला त्याने त्याच्या दासांना ज्यांना आमंत्रणे दिली होती त्यांना, ‘चला आता भोजनाची सर्व तयारी झाली आहे’ असे सांगण्यास पाठविले.
18“परंतु ते प्रत्येकजण सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’
19“दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’
20“तिसरा म्हणाला, ‘माझा नुकताच विवाह झाला आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’
21“शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व आपल्या दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांत व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’
22“ ‘महाराज,’ दास म्हणाले, ‘आपल्या आदेशाप्रमाणे केले आहे, परंतु अजून पुष्कळ जागा रिकामी राहिली आहे.’
23“त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातील रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. 24कारण ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना भोजनातले काहीही चाखावयास मिळणार नाही.’ ”
शिष्य होण्यास द्यावे लागणारे मोल
25लोकांचा मोठा घोळका येशूंच्या मागे चालला होता. तेव्हा ते मागे वळून लोकांना म्हणाले, 26“जो कोणी माझ्याकडे येतो आणि जर आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. 27त्याचप्रमाणे जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
28“समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का? 29कारण जर तुम्ही पाया घातला आणि नंतर जर तो पूर्ण करण्यास समर्थ झाला नाही, तर ते पाहून प्रत्येकजण त्याची थट्टा करतील. 30म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’
31“किंवा असा कोण राजा आहे, जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का? 32जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल. 33त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याजवळ आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग करीत नाही तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही.
34“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने परत आणाल? 35ते जमिनीच्या व खताच्याही उपयोगाचे नाही; ते बाहेर टाकून दिले जाईल.
“ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”

Επιλέχθηκαν προς το παρόν:

लूक 14: MRCV

Επισημάνσεις

Κοινοποίηση

Αντιγραφή

None

Θέλετε να αποθηκεύονται οι επισημάνσεις σας σε όλες τις συσκευές σας; Εγγραφείτε ή συνδεθείτε