योहान 16
16
1तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
2ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.
3त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
4मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो.
5परंतु ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि ‘आपण कोठे जाता?’ असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही.
6ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे.
7तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.
8तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील :
9ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी;
10मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी;
11आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी,
12मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.
13तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील.
14तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.
15जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.
वियोगसमयीचे उद्गार
16थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही; आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. [कारण मी पित्याकडे जातो.]”
17ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “हा आम्हांला, ‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो,’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
18ते म्हणत होते, “‘थोड्या वेळाने,’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही.”
19आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय?
20मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
21स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही.
22ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही.
23त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल.
24तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
25ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे.
26त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल. आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही;
27कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
28मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.”
29त्याचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही.
30आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते, आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”
31येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय?
32पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
33माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”
Επιλέχθηκαν προς το παρόν:
योहान 16: MARVBSI
Επισημάνσεις
Κοινοποίηση
Αντιγραφή
Θέλετε να αποθηκεύονται οι επισημάνσεις σας σε όλες τις συσκευές σας; Εγγραφείτε ή συνδεθείτε
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.