उत्पत्ती 9

9
परमेश्वराचा नोआहशी करार
1परमेश्वराने नोआहला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन सांगितले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. 2पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे; 3जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.
4“परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस 5आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्‍या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.
6“जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील,
मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल;
कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात
मानवाला निर्माण केले आहे.
7तुम्ही तर फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका आणि तिच्यावर संपन्न व्हा.”
8मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले: 9“आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो. 10तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो. 11यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो.”
12आणि परमेश्वर म्हणाले, “माझ्या आणि तुझ्यामध्ये व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत आहेत त्यांच्यामध्ये सर्वकाळाच्या पिढ्यांपर्यंत जो करार मी करतो त्याची खूण हीच आहे: 13पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे 14ज्यावेळी मी पृथ्वीवर मेघ आणेन, त्यावेळी हे धनुष्य मेघांत प्रगट होईल. 15आणि पृथ्वीवर पुन्हा जलप्रलय येणार नाही आणि सर्व प्राणिमात्रांचा नाश होणार नाही, तुमच्याशी आणि प्रत्येक प्राण्याशी केलेल्या या कराराची मला आठवण होईल. 16जेव्हा मी ते धनुष्य मेघांमध्ये पाहीन, तेव्हा परमेश्वर आणि पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राशी केलेल्या सार्वकालिक कराराची मला आठवण होईल.”
17परमेश्वर नोआहस म्हणाले, “पृथ्वीवरील सर्व सजीव व माझ्याबरोबर स्थापित झालेल्या कराराचे हे चिन्ह असेल.”
नोआहचे पुत्र
18नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.) 19हे नोआहचे तीन पुत्र होते आणि यांच्याद्वारे पृथ्वीवर मानवजात पसरली.
20नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला. 21एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. 22कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना सांगितली. 23हे ऐकून शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला; आपल्या खांद्यांपर्यंत तो उंच धरून ते आपल्या पित्याची नग्नता झाकली जावी म्हणून उलट्या पावली चालत जाऊन, विरुद्ध दिशेला पाहत त्यांनी तो झगा त्याच्या अंगावर टाकला.
24नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले, 25तो म्हणाला,
“कनान शापित असो!
तो आपल्या भावांच्या गुलामातील
सर्वात कनिष्ठ गुलाम होवो.”
26मग नोआह असेही म्हणाला,
“शेमचे परमेश्वर याहवेह यांची स्तुती असो!
कनान शेमचा गुलाम होवो.
27परमेश्वर याफेथच्या#9:27 याफेथ अर्थात् विस्तार प्रदेशाचा विस्तार करोत;
याफेथ शेमच्या तंबूत राहो,
आणि कनान त्याचाही गुलाम होवो.”
28जलप्रलयानंतर नोआह साडेतीनशे वर्षे जगला. 29950 वर्षाचा होऊन नोआह मृत्यू पावला.

Markierung

Teilen

Kopieren

None

Möchtest du deine gespeicherten Markierungen auf allen deinen Geräten sehen? Erstelle ein kostenloses Konto oder melde dich an.

Video zu उत्पत्ती 9