उत्पत्ती 39

39
योसेफ आणि पोटीफराची पत्नी
1इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले.
2याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे. 3पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात, 4त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले. 5जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता. 6म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही.
योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. 7काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”
8योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे. 9या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.” 10ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.
11एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते; 12तिने त्याच्या झग्याला पकडले आणि म्हणाली, “माझ्याबरोबर नीज!” पण त्याने त्याचा झगा तिच्या हातातच सोडला आणि घराबाहेर पळाला.
13त्याचा झगा आपल्याच हातात आहे आणि तो पळून गेला आहे हे तिच्या लक्षात आले, 14तेव्हा तिने घरातील सेवकांना बोलाविले. ती म्हणाली, “आमच्या घराचा उपमर्द करण्यासाठीच हा इब्री गुलाम घरात आणला आहे! त्याने माझ्यासोबत निजण्याचा प्रयत्न केला, पण मी किंचाळले. 15जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”
16तिने तिचा धनी घरी येईपर्यंत तो झगा आपल्याजवळच ठेवला. 17नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 18पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”
19“तुमचा गुलाम माझ्याशी असा वागला.” असे म्हणून पत्नीने सांगितलेला वृतांत ऐकताच त्याचा धनी रागाने बेभान झाला. 20योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले,
परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता, 21याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्‍याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले. 22तुरुंगाच्या अधिकार्‍याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले. 23त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्‍याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत.

Markierung

Teilen

Kopieren

None

Möchtest du deine gespeicherten Markierungen auf allen deinen Geräten sehen? Erstelle ein kostenloses Konto oder melde dich an.

Video zu उत्पत्ती 39