उत्पत्ती 19

19
सदोम आणि गमोराचा नाश
1त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले. 2लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.”
ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”
3पण लोटाने फारच आग्रह केल्यामुळे ते त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेले. त्याने त्यांच्यासाठी बेखमीर भाकरीचे भोजन तयार केले, आणि ते जेवले. 4ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला. 5लोटाला ते ओरडून म्हणाले, “जे पुरुष तुझ्याकडे आज रात्री आले ते कुठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
6लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले. 7“आणि म्हणाला, नाही माझ्या मित्रांनो, असे भयंकर दुष्कर्म करू नका. 8पाहा, मला दोन कन्या आहेत ज्या अजून कुमारिका आहेत. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो; त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसे वागा, पण या दोन माणसांच्या वाटेला जाऊ नका, कारण ते माझ्या आश्रयाला आले आहेत.”
9“आमच्या मार्गातून दूर जा,” ते म्हणाले. “हा मनुष्य इथे परदेशी म्हणून आला होता आणि आता त्याला न्यायाधीशाची भूमिका करावयाची आहे! आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागवू.” ते लोटावर दबाव टाकत राहिले आणि दार तोडण्यासाठी पुढे गेले.
10पण आतील त्या पुरुषांनी लोटाला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले. 11मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना.
12ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “या ठिकाणी तुझे जावई, मुले किंवा मुली किंवा अजून कोणी या शहरात जे तुझे आपले असे आहे काय? त्यांना येथून बाहेर काढ, 13कारण आम्ही या शहराचा नाश करणार आहोत. याहवेहपर्यंत या लोकांविरुद्ध आलेला आक्रोश इतका मोठा आहे की त्यांनी आम्हाला त्याचा नाश करण्यासाठी पाठविले आहे.”
14तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध#19:14 वचनबद्ध अर्थात् मागणी झालेले होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे.
15पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.”
16पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती. 17दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!”
18यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका! 19तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन. 20पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.”
21तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही. 22पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर#19:22 सोअर अर्थात् लहान नगरी असे पडले.)
23सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला. 24मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला; 25आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला. 26परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली.
27दुसर्‍या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला. 28त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले.
29मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.
लोट आणि त्याच्या कन्या
30पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला. 31एके दिवशी थोरली मुलगी धाकट्या बहिणीला म्हणाली, “आपले वडील म्हातारे झाले आहेत आणि आजूबाजूला एकही पुरुष नाही की जो आपल्याला मूल देईल—जशी पृथ्वीवरील प्रथा आहे. 32तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.”
33त्या रात्री त्यांनी लोटाला भरपूर मद्य पाजले. मग थोरली आत गेली आणि तिने आपल्या वडिलांबरोबर शय्या केली; ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!
34दुसर्‍या दिवशी सकाळी थोरली मुलगी आपल्या धाकट्या बहिणीस म्हणाली, “काल रात्री मी आपल्या वडिलांबरोबर शय्या केली, आज रात्रीही आपण त्यांना भरपूर मद्य पाजू आणि मग तू त्यांच्याशी शय्या कर म्हणजे अशा रीतीने आपला वंश आपल्या वडिलांद्वारे पुढे चालेल.” 35त्याप्रमाणे त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना पुन्हा भरपूर मद्य पाजले. मग धाकटी मुलगी आत गेली आणि त्याच्यासोबत शय्या केली. ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!
36अशा रीतीने लोटाच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या. 37थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब#19:37 मोआब अर्थात् पित्याद्वारे असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. 38धाकट्या मुलीलासुद्धा पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव बेनअम्मी#19:38 बेनअम्मी अर्थात् माझ्या पित्याच्या लोकांचा पुत्र असे ठेवले, तो अम्मोनी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला.

Markierung

Teilen

Kopieren

None

Möchtest du deine gespeicherten Markierungen auf allen deinen Geräten sehen? Erstelle ein kostenloses Konto oder melde dich an.

Video zu उत्पत्ती 19