उत्पत्ती 2

2
1अशा रीतीने आकाश, पृथ्वी व त्यातील सर्वांची निर्मिती पूर्ण झाली.
2परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली. 3सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.
आदाम आणि हव्वा
4याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली.
5जमिनीवर अद्याप वनस्पती उगवली नव्हती, कारण याहवेह परमेश्वराने अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी मनुष्य नव्हता. 6मात्र जमिनीवरून धुके#2:6 किंवा धुरासारखे जलबिंदूचे पटल वर जात असे आणि त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. 7मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य#2:7 हिब्रूमध्ये मानव घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.
8नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 9याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले.
10बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या 11पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. 12त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती#2:12 इतर मूळ प्रतींनुसार सुवासिक डिंक व गोमेद रत्नेही सापडतात. 13दुसर्‍या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या#2:13 किंवा मेसोपोटेमिया सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. 14तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल#2:14 किंवा ज्याला आज टायग्रीस म्हणून ओळखले जाते असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात#2:14 किंवा ज्याला आज युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते असे आहे.
15याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. 16याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा; 17परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”
18याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.”
19याहवेह परमेश्वराने भूमीपासून प्रत्येक जातीचे वन्यपशू, आकाशातील सर्व पक्षी निर्माण केले. त्यांना मानव कोणती नावे देतो हे पाहण्याकरिता त्याच्याकडे आणले; आणि त्याने जी नावे दिली तीच त्यांची नावे पडली. 20याप्रकारे मानवाने सर्व पाळीव प्राण्यांना, आकाशातील पक्ष्यांना आणि जमिनीवरील सर्व पशूंना नावे दिली.
परंतु आदामाला योग्य असा मदतनीस त्यांच्यामध्ये नव्हता. 21नंतर याहवेह परमेश्वराने मानवाला#2:21 किंवा आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपेत असताना याहवेह परमेश्वराने त्याची एक फासळी काढली आणि ती जागा त्यांनी मांसाने भरून काढली. 22याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले.
23तेव्हा मानव म्हणाला,
“ही माझ्या हाडाचे हाड
आणि मांसाचे मांस आहे;
हिला नारी असे म्हणतील,
कारण ती नरापासून बनविली आहे.”
24या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.
25आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind