लूक 12
12
ढोंगाविरूद्ध येशू आपल्या शिष्यांस इषारा देतो
मत्त. 10:26, 27
1आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा. 2उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. 3म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरुन घोषित केले जाईल.”
तो आपल्या शिष्यांस धैर्य देतो
मत्त. 10:8-31
4 “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. 5तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. 6पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. 7पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
8 जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. 9परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल. 10प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्यास क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्यास क्षमा केली जाणार नाही. 11जेव्हा ते तुम्हास सभास्थाने, राज्यकर्ते व अधिकारी यांच्यासमोर धरुन आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका. 12कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.”
द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत
13नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!” 14परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” 15मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.” 16नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले. 17तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’ 18मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’ 19आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ 20पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’ 21जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
चिंतेबाबत इषारा
मत्त. 6:19-21, 25-34
22मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. 23कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. 24कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात! 25चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? 26ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता? 27रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता. 28तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय! 29तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. 30कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. 31त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील.
32 हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.
33 तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही. 34कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाऱ्याचा दृष्टांत
मत्त. 24:42-51
35 तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. 36लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. 37मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. 38तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य. 39परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते. 40तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.”
41मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?” 42तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे? 43त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य. 44मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील. 45पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो, 46तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील. 47आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. 48परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.”
काळाची लक्षणे
मत्त. 10:34-39
49 “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे? 50मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! 51मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल. 53त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.
54तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते. 55जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. 56अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय?
57 आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही? 58तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील. 59मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.”
Valgt i Øjeblikket:
लूक 12: IRVMar
Markering
Del
Kopiér
Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.