लूक 15
15
हरवलेले मेंढरू
1सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.
2तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”
3मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला :
4“तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही?
5ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो;
6आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
7त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.
हरवलेले नाणे
8तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही?
9ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
10त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”
उधळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ
11आणखी तो म्हणाला, “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते;
12त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली.
13मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.
14त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली.
15मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले.
16तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे.
17नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे.
18मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे;
19आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मी योग्य नाही; आपल्या एका मोलकर्याप्रमाणे मला ठेवा.’
20मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.
21मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’
22पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,
23आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू;
24कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले.
25त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला.
26तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’
27त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे; आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’
28तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला;
29परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.
30पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’
31त्याने त्याला म्हटले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.
32तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’
Valgt i Øjeblikket:
लूक 15: MARVBSI
Markering
Del
Kopiér

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.