उत्पत्ती 32

32
याकोब एसावाला भेटण्याची तयारी करतो
1इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले.
2त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले.
3मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.
4त्यांना त्याने आज्ञा दिली की, “माझा स्वामी एसाव ह्याला जाऊन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाकडे उपरा असा जाऊन राहिलो होतो.
5आता माझी गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप, दास व दासी आहेत; माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवीत आहे.”
6जासुदांनी परत येऊन याकोबाला सांगितले, “आम्ही आपला भाऊ एसाव ह्याला जाऊन भेटलो; तो आपल्याला भेटायला येत आहे, त्याच्याबरोबर चारशे माणसे आहेत.”
7तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या.
8तो म्हणाला, “एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल.”
9मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन.
10तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.
11मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.
12तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”
13त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली;
14दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
15तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे,
16ह्या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एकेक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, “तुम्ही कळपाकळपांत अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा.”
17त्याने सर्वांत पुढच्या चाकराला सांगितले की, “माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारील की तू कोणाचा? कोठे चाललास? आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची?”
18तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.”
19मग दुसर्‍याला, तिसर्‍याला आणि इतर सर्व कळप हाकून नेणार्‍यांना अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की, “तुम्हांला एसाव भेटला तर असेच बोला,
20आणि सांगा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे.” याकोबाला वाटले की, पुढे भेट पाठवून त्याला शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील.
21ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला.
पनीएल येथे याकोबाने केलेली झुंज
22मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले ह्यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला.
23त्याने त्यांना नदीपलीकडे उतरवून लावले, आणि आपले जे काही होते तेही पाठवले.
24याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली.
25याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली.
26मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.”
27त्याने मग त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो म्हणाला, “याकोब.”
28त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”
29मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला.
30मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.”
31तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला;
32म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत; ह्याचे कारण हेच की, त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind