उत्पत्ती 28

28
1तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, “कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नकोस.
2तर ऊठ, पदन-अराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल ह्याच्या घरी जा व तुझा मामा लाबान ह्याच्या मुलींपैकी बायको कर.
3सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उद्भवो;
4तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.
5अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली, आणि याकोब पदन-अराम येथे याकोब व एसाव ह्यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान, जो अरामी बथुवेलाचा मुलगा, त्याच्याकडे गेला. एसाव दुसरी पत्नी करतो 6एसावाने पाहिले की, इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन-अराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे; आणि आशीर्वाद देताना त्याने त्याला बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नकोस;
7आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन-अरामास गेला आहे.
8आपला बाप इसहाक ह्याला कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून 9एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम ह्याची मुलगी व नबायोथाची बहीण महलथ हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकांत सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न 10इकडे याकोब बैर-शेबा येथून हारानास जायला निघाला.
11तो एके जागी पोहचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी ह्या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला.
12तेव्हा त्याला स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत.
13आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;
14तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.
15पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”
16मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, “खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते.”
17तो भयभीत होऊन म्हणाला, “हे किती भयप्रद स्थल आहे! हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे!”
18याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला.
19त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते.
20याकोबाने असा नवस केला की, “देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल,
21आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल,
22हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind