उत्पत्ती 22

22
इसहाकाचे अर्पण करण्याची अब्राहामाला आज्ञा
1ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?” 2देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”
3तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला.
4तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली.
5अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”
6तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले.
7तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम ह्याला म्हटले, “बाबा!” तो म्हणाला, “काय म्हणतोस बाळा?” त्याने म्हटले, “पाहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”
8अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले.
9देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले.
10मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला.
11तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?”
12मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”
13तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला.
14म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.
15परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले,
16“परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस;
17ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील.
18तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”
19मग अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याच्याबरोबर बैर-शेबा येथे गेले; आणि अब्राहाम बैर-शेबा येथे राहिला.
नाहोराचे वंशज
20ह्या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहामास सांगितले, “पाहा, तुझा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे.
21ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल,
22आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बथुवेल.
23बथुवेलास रिबका झाली; अब्राहामाचा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
24आणि त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind