उत्पत्ती 20

20
अब्राहाम आणि अबीमलेख
1अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली.
2आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले.
3देव रात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, “तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवर्‍याची बायको आहे.”
4अबीमलेख काही तिच्यापाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? 5‘ती माझी बहीण आहे’ असे तो म्हणाला नाही काय? तसेच ‘तो माझा भाऊ आहे’ असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्त्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे.”
6देवाने त्याला स्वप्नात म्हटले, “तू सात्त्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि माझ्याविरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही; म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
7आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाहीस, तर तू व तुझे जे आहेत ते सगळे खचीत मरतील.”
8मग अबीमलेखाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकांना बोलावून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या; तेव्हा ती माणसे फार घाबरली.
9अबीमलेखाने अब्राहामाला बोलावून आणून म्हटले, “तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस.”
10अबीमलेख अब्राहामाला आणखी म्हणाला, “ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात होते तरी होते?”
11अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले.
12शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी; पण माझ्या आईची ती मुलगी नाही म्हणून ती माझी बायको झाली.
13देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले तेव्हा मी तिला म्हणालो, ‘माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे, हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग.”’
14मग अबीमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी आणून अब्राहामाला दिली आणि त्याची बायको साराही त्याला परत दिली.
15अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा देश तुला मोकळा आहे; तुला वाटेल तेथे राहा.”
16तो सारेला म्हणाला, “पाहा, मी तुझ्या भावाला रुप्याची एक हजार नाणी देत आहे; त्यांच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. ह्या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे.”
17मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासी ह्यांना बरे केले, आणि त्यांना मुले होऊ लागली.
18कारण अब्राहामाची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind