मत्तय 6
6
दानधर्म कसा करावा
1“तुमच्या नीतिमत्वाचे आचरण लोकांसमोर न करण्याची काळजी घ्या. कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणार्या प्रतिफळास तुम्ही मुकाल.
2“म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्या वाजवून जाहीर करू नका, ढोंगी जसे, रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे. 3तुम्ही गरजवंतास देता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. 4म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.
प्रार्थना
5“तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 6तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील. 7आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. 8त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते.
9“तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा:
“ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुमचे नाव पवित्र मानिले जावो,
10तुमचे राज्य येवो,
जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही,
तुमची इच्छा पूर्ण होवो.
11आमची रोजची भाकर आज आम्हाला द्या.
12आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे,
तशी तुम्ही आमच्या पापांची#6:12 मूळ भाषेत अपराध ऐवजी हा शब्द आहे परीक्षा क्षमा करा.
13आणि आम्हास परीक्षेत आणू नका,
परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन#6:13 काही शेवटच्या प्रतींमध्ये हे वाक्य समाविष्ट केलेले नाही’
14ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील. 15पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.
उपास कसा करावा
16“तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहो असे लोकांना दाखविण्यासाठी ते उतरलेल्या चेहर्यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे. 17तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, 18म्हणजे तुम्ही उपास करीत आहा असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
खरी संपत्ती
19“तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तेथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात. 20पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तेथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. 21कारण जेथे तुमची संपत्ती आहे, तेथे तुमचे मनही असेल.
22“डोळा शरीराचा दिवा आहे. तुमचे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल. 23पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!
24“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
चिंता करू नका
25“मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी की आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्वाचे नाही काय? 26आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरीदेखील तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलाचे नाही का? 27शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?#6:27 एक तास किंवा एक मीटर उंच
28“आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. 29तरी मी तुम्हाला सांगतो की शलमोन राजादेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. 30जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील? 31म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका. 32कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे. 33परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. 34म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.
Právě zvoleno:
मत्तय 6: MRCV
Zvýraznění
Sdílet
Kopírovat
Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.