Logo YouVersion
Ikona vyhledávání

उत्पत्ती 35

35
याकोब बेथेल येथे परत येतो
1मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”
2म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला. 3चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.” 4तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली. 5मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.
6शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले. 7त्या ठिकाणी याकोबाने एक वेदी उभारली व त्या वेदीचे नाव त्याने एल बेथेल#35:7 एल बेथेल अर्थात् बेथेलचे परमेश्वर असे ठेवले; कारण तो एसावापासून पळून जात असता परमेश्वराने येथेच त्याला दर्शन दिले होते.
8यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ#35:8 अल्लोन-बकूथ अर्थात् विलापाचा एलावृक्ष असे नाव पडले.
9याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 10परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल#35:10 इस्राएल म्हणजे परमेश्वराशी झुंज करणारा असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.
11परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर#35:11 मूळ भाषेत एल-शद्दाय आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील. 12अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.” 13ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणाहून परमेश्वर वर निघून गेले.
14नंतर याकोबाने ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणी एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर परमेश्वराला पेयार्पण#35:14 पेयार्पण अर्थात् द्राक्षारस ओतला ओतले आणि त्या स्तंभावर तैलाभ्यंग केला. 15ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल#35:15 परमेश्वराचे घर असे ठेवले.
राहेलचा व इसहाकाचा मृत्यू
16मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले. 17अतिशय त्रासदायक प्रसूती होताना सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस; कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे.” 18तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी#35:18 अर्थात् माझ्या कष्टाचा पुत्र ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन#35:18 अर्थात् माझ्या उजव्या हाताचा पुत्र ठेवले.
19अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्‍या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली. 20मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे.
21मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला. 22तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.
याकोबाला बारा पुत्र होते:
23लेआचे पुत्र:
याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन,
मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.
24राहेलचे पुत्र:
योसेफ व बिन्यामीन हे होते.
25राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र:
दान व नफताली हे होते.
26लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र:
गाद व आशेर हे होते.
हे सर्व पुत्र याकोबाला पद्दन-अराम येथे झाले.
27अशा रीतीने शेवटी याकोब किर्याथ-अर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रे या ठिकाणी आपला पिता इसहाक याच्याकडे येऊन पोहोचला. याच ठिकाणी अब्राहामही राहिला होता. 28इसहाक एकशेऐंशी वर्षे जगला. 29तो परिपक्व वयाचा वयोवृद्ध होऊन मरण पावला आणि त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला मूठमाती दिली.

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas