Logo YouVersion
Ikona vyhledávání

उत्पत्ती 29

29
याकोब पदनअराम येथे येतो
1प्रवास करीत याकोब पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात आला. 2त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते. 3सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.
4याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?”
ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”
5तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?”
“हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले.
6यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?”
“तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले.
7याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.”
8आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.”
9त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती. 10जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले. 11नंतर याकोबाने राहेलचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडू लागला. 12याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.
13लाबानाला आपल्या बहिणीचा मुलगा याकोबाची बातमी कळताच तो त्याला लगबगीने भेटावयाला आला. त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले आणि तिथे याकोबाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. 14तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.”
लेआ व राहेल यांच्याशी याकोब विवाह करतो
याकोबाला तिथे राहून सुमारे एक महिना झाल्यानंतर, 15लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?”
16लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. 17लेआचे डोळे निस्तेज#29:17 किंवा नाजूक होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती. 18याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”
19लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.” 20याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.
21तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”
22तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली. 23परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली. 24आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.
25पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”
26लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही. 27लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”
28याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली. 29लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली. 30मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले.
याकोबाची संतती
31याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. 32लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन#29:32 अर्थात् पाहा, एक पुत्र असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”
33लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन#29:33 अर्थात् ऐकणारा असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”
34मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी#29:34 अर्थात् जोडलेला असे ठेवण्यात आले.
35ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह#29:35 अर्थात् स्तुती असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas