Logo YouVersion
Ikona vyhledávání

उत्पत्ती 24

24
इसहाक आणि रिबेकाह
1अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. 2अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्‍या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. 3स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस, 4याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.”
5सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?”
6“माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला. 7“कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल. 8पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.” 9तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली.
10मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम#24:10 अराम-नहराईम किंवा मेसोपोटेमिया मधील नाहोराच्या नगरास गेला. 11तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.
12त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा. 13पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत. 14माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”
15त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता. 16ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.
17अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.”
18“प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले.
19त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.” 20तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले. 21ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही.
22शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका#24:22 अंदाजे 5.7 ग्रॅ. वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल#24:22 अंदाजे 115 ग्रॅ. वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. 23नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?”
24तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.” 25आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.”
26तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लवविले आणि याहवेहची आराधना केली. 27तो म्हणाला, “माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहची स्तुती असो, माझ्या धन्याबरोबर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि विश्वासूपणाने वागता म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझ्या धन्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबात तुम्ही मला सरळ घेऊन आला म्हणूनही मी तुमचे आभार मानतो.”
28तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली. 29रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला; 30त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे. 31त्याने म्हटले, “या, तुम्ही जे याहवेहद्वारे आशीर्वादित आहात, बाहेर का उभे आहात? तुम्हाला राहण्यास खोली आणि उंटांकरिता मी जागा तयार केली आहे.”
32मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले. 33यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.”
लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.”
34तेव्हा तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे. 35याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत. 36माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे. 37त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. 38माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे.
39“मग मी माझ्या धन्यास विचारले, ती मुलगी माझ्याबरोबर परत आली नाही तर?
40“यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण. 41याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’
42“आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा. 43पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’ 44आणि यावर ती मला म्हणेल, ‘अवश्य महाराज, आणि मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजीन,’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या पुत्राची पत्नी होण्यासाठी याहवेहने निवडलेली आहे असे होऊ द्या.
45“माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’
46“मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
47“मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’
“ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’
“हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या. 48माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले. 49तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.”
50यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे? 51ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.”
52जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे ऐकले, त्याने याहवेहपुढे गुडघे टेकले. 53मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या. 54यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला.
दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे परत जाण्यास मला निरोप द्या.”
55परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.”
56पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.”
57तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो” 58त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?”
तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.”
59तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली. 60एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला:
“आमच्या भगिनी,
तू लक्षावधींची माता हो;
तुझी संतती
त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”
61नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.
62दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता. 63एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. 64रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली 65आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?”
“ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले.
66आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला. 67मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas