YouVersion Logo
Search Icon

प्रकटीकरण 4

4
स्वर्गातील सिंहासन
1यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवीन” 2मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता. 3आणि जो तेथे बसला होता तो हिर्‍यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते; 4राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. 5राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते. 6त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते.
राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते. 7या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. 8त्या चारही सजिव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे घोष करीत होते:
“पवित्र, पवित्र, पवित्र,
ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहे!#4:8 यश 6:3
जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”
9जे राजासनावर बसलेले आहे आणि जे युगानुयुग जिवंत आहे, त्यांचा त्या सजिव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली, 10त्या त्या वेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले:
11“हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा,
गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात;
कारण तुम्ही सर्व निर्माण केले.
तुमच्याच इच्छेने सर्वकाही
अस्तित्वात आले.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in