मार्क 9
9
1ते त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, परमेश्वराचे राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”
रूपांतर
2सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले. 3त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही. 4तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले.
5तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.” 6त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते.
7इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”
8मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही.
9ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका. 10म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले.
11नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”
12येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे? 13पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.”
येशू अशुद्ध आत्मा लागलेल्या मुलास बरे करतात
14जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले. 15येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले.
16येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?”
17गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे; 18ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.”
19येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.”
20त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला.
21“हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले.
वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून, 22त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.”
23“जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”
24मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”
25हे पाहण्याकरिता लोक धावत तिथे येत आहेत, हे पाहून येशूंनी अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.”
26हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले. 27परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.
28नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”
29त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”#9:29 काही मूळ प्रतींमध्ये प्रार्थना आणि उपास
येशू आपल्या मृत्यूचे दुसर्यांदा भविष्य करतात
30ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला, 31कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” 32परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.
33मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?” 34परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता.
35ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
36मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले, 37“जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”
आमच्याविरुद्ध नसलेला आमच्या बाजूचा असतो
38योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.”
39येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही. 40कारण जो आपल्याविरुद्ध नाही, तो आपल्या बाजूचा आहे. 41मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.
अडखळण करणे
42“जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल. 43जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.” 44ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.#9:44 हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही 45जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे. 46ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.#9:46 हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही 47जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे उत्तम आहे. 48ज्या ठिकाणी,
“ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत,
किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’
49प्रत्येकजण अग्नीद्वारे खारट केले जातील.
50“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.”
Currently Selected:
मार्क 9: MRCV
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.