मार्क 15
15
पिलातासमोर येशू
1प्रातःकाळ झाल्यावर सर्व प्रमुख याजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा, यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलात याच्या स्वाधीन केले.
2पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूंनी उत्तर दिले, “तू म्हटले तसे.”
3प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्यांनी येशूंवर अनेक आरोप केले. 4म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.”
5परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले.
6आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती. 7बरब्बा म्हटलेला एक माणूस त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता. 8आता रितीप्रमाणे जसे तो करत होता तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय पिलाताला करू लागला.
9“तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” पिलाताने विचारले, 10प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते. 11पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास पेटविले.
12पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”
13लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!”
14“पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?”
पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
15लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
सैनिक येशूंची थट्टा करतात
16मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलावले. 17त्यांनी त्यांना जांभळा झगा घातला आणि काट्यांचा एक मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर घातला. 18नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” 19त्यांनी त्यांच्या मस्तकांवर छडीने वारंवार मारले व ते त्यांच्या तोंडावर थुंकले. त्यांच्यासमोर त्यांनी गुडघे टेकून त्यांची उपासना केली. 20येशूंची अशी थट्टा केल्यावर, त्यांनी त्याला घातलेला जांभळा झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता बाहेर घेऊन गेले.
येशूंना क्रूसावर खिळणे
21आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता, कुरेने गावचा कोणी एक शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. 22मग त्यांनी येशूंना गुलगुथा या नावाने ओळखल्या जाणार्या भागात आणले. गुलगुथा याचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. 23त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. 24मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
25त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. 26एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता:
“यहूद्यांचा राजा.”
27त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. 28अशा रीतीने, “दुष्ट लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला.#15:28 काही मूळप्रतींमध्ये सारखेच शब्द आढळतात लूक 22:37. 29जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत, म्हणाले, “तू मंदिर उध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, 30तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर!” 31त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली, “त्याने दुसर्यांचे तारण केले,” ते म्हणाले, “पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही 32तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली.
येशूंचा मृत्यू
33संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. 34आणि तीन वाजता दुपारी, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”#15:34 स्तोत्र 22:1
35तेथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले, व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाला बोलावित आहे.”
36कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज वेतावर ठेवून येशूंना प्यावयास दिला. ते म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीया त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!”
37मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.
38तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, 39जेव्हा शताधिपतीने, जो येशूंच्या समोर उभा होता, त्याने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”
40अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी या होत्या. 41गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंच्या मागे आल्या होत्या आणि त्या त्याची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या अनेक स्त्रियाही तेथे होत्या.
येशूंना कबरेत ठेवतात
42हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना, 43अरिमथियाकर योसेफ, सभेचा एक सन्मान्य सभासद स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले. 44येशू इतक्या लवकर मरण पावले हे ऐकून पिलाताला नवल वाटले. त्याने शताधिपतीला बोलावले आणि विचारले, येशूंचा मृत्यू अगोदरच झाला आहे की काय? 45ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले. 46योसेफाने एक तागाचे कापड विकत आणले, शरीर खाली काढले, तागाच्या वस्त्राने गुंडाळले आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने शिळा लोटून ठेवली. 47त्यांना कबरेत कोठे ठेवले हे, मरीया मग्दालिया आणि योसेफाची आई मरीया यांनी पाहिले.
Currently Selected:
मार्क 15: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.