मार्क 12
12
कुळांचा दाखला
1मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी खड्डा खणला आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो दुसर्या ठिकाणी रहावयास गेला. 2हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळांतून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. 3परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. 4त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. 5त्यानंतर त्याने आणखी एकाला, ज्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले.
6“आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ त्याचा पुत्र, ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो, राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’
7“पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ 8त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून, त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.
9“द्राक्षमळ्याचा धनी काय करील असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल. 10तुम्ही धर्मग्रंथात हा लेख वाचला नाही काय:
“ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला,
तोच कोनशिला झाला आहे;
11ही परमेश्वराची करणी आहे,
आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे.’#12:11 स्तोत्र 118:22, 23”
12प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले.
कैसराला कर देणे
13काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले. 14ते त्याच्याकडे आले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही व खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता; तर आम्हाला सांगा, कैसराला कर#12:14 विशेष कर प्रजेवर लादला जातो, पण रोमी नागरीकांवर नाही. देणे योग्य आहे की नाही? 15आम्ही कर भरावा की नाही?”
परंतु येशूंनी त्यांचे ढोंग ओळखले व ते म्हणाले, “तुम्ही मला सापळयात का पाडू पाहता? एक दिनार आणा आणि मला दाखवा.” 16त्याप्रमाणे त्यांना एक नाणे दिले आणि त्यांनी विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”
“कैसराचा” त्यांनी उत्तर दिले.
17तेव्हा प्रभू येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
तेव्हा ते त्यांच्याविषयी आश्चर्यचकित झाले.
पुनरुत्थानासमयी लग्न
18मग सदूकी, जे पुनरुत्थान नाही असे म्हणणारे, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. 19त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवा पत्नीशी विवाह करावा आणि भावाच्या नावाने वंशवृद्धी करावी. 20आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला. 21मग दुसर्या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्याचेही तसेच झाले. 22ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली. 23आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”
24येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ही ओळखता? 25जेव्हा मृत लोक उठतील, लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. 26पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा#12:26 निर्ग 3:6 परमेश्वर आहे?’ 27तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंताचा परमेश्वर आहे, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”
सर्वश्रेष्ठ आज्ञा
28कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तेथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्वाची कोणती आहे?”
29येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्वाची आज्ञा ही आहे की ‘हे इस्राएला ऐक, प्रभू आपला परमेश्वर एकमेव परमेश्वर आहे. 30तुमचा प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्ण शक्तीने प्रीती कर.’#12:30 अनु 6:4, 5 31दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर#12:31 लेवी 19:18 तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32“योग्य बोललात, गुरुजी” त्या माणसाने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहे आणि त्यांच्याशिवाय दुसरा परमेश्वर नाही’ हे आपण बरोबर सांगितले आहे. 33परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण शक्तीने प्रीती करणे, आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करणे, हे सर्वप्रकारचे अर्पणे व धुपबली वाहण्यापेक्षा फारच महत्वाचे आहे.”
34त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
ख्रिस्त कोणाचा पुत्र?
35नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?” 36कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो,
“ ‘परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाले,
“मी तुझ्या शत्रूंना,
तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत,
तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’#12:36 स्तोत्र 110:1
37स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”
जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.
नियमशास्त्रशिक्षकासंबंधी इशारा
38येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून अभिवादन घेणे, 39सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. 40ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
विधवेचे दान
41येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. 42मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.
43ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दान पात्रात टाकले आहे. 44कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरीबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”
Currently Selected:
मार्क 12: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.