मत्तय 25
25
दहा कुमारिकांचा दाखला
1“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल. 2त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. 3मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही. 4शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले. 5वराला येण्यास उशीर लागला म्हणून सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
6“मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.
7“मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. 8मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’
9“त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’
10“त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.
11“काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’
12“पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’
13“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.
सोन्याच्या शिक्यांचा दाखला
14“पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली. 15त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत,#25:15 सोन्याचे पाच तालांत 20 वर्षांच्या मजुरी इतकी होती. दुसर्याला दोन आणि तिसर्याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला. 16नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या. 17त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या. 18पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली.
19“बर्याच काळानंतर त्यांचा धनी परतला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलाविले. 20ज्याला पाच थैल्या मिळाल्या होत्या, त्याने धन्याला दहा आणून दिल्या. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच थैल्या दिल्या होत्या; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविल्या आहेत.’
21“त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
22“यानंतर ज्याला दोन थैल्या दिल्या होत्या, तो सेवक सुद्धा पुढे आला; तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला दोन थैल्या दिल्या होत्या, त्या मी दुप्पट केल्या आहेत.’
23“त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
24“नंतर ज्याला एक थैली दिली होती, तो सेवक पुढे आला. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जिथे तुम्ही पेरले नाही, तिथे कापणी करता आणि जिथे तुम्ही विखुरले नाही तिथे गोळा करता. 25मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’
26“यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते. 27तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.
28“ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या. 29कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. 30आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’
मेंढरे आणि शेळ्या
31“जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल. 32मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल. 33मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.
34“मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या. 35मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले; 36मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’
37“त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले? 38तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? 39तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’
40“मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
41“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा. 42कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44“ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’
45“तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’
46“मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”
Currently Selected:
मत्तय 25: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.