YouVersion Logo
Search Icon

मत्तय 18

18
स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ
1त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?”
2तेव्हा येशूंनी एका लहान लेकराला जवळ बोलाविले आणि त्या लेकराला त्यांच्यामध्ये उभे केले. 3मग येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. 4म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल. 5आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
अडखळण आणण्याचे कारण
6“जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लहानातील एकालाही अडखळण आणतो, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल. 7ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण येणारच नाही हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो. 8तुझा हात किंवा पाय तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून शाश्वत अग्नीत टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे 9जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.
भटक्या मेंढराचा दाखला
10“या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात. 11मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.#18:11 काही मूळ प्रतींमध्ये लूक 19:10 चा उल्लेख केला आहे
12“तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय? 13आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल. 14त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.
मंडळीत पाप करणार्‍याबरोबर कसे वर्तन करावे
15“तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप#18:15 काही मूळ प्रतींमध्ये तुझ्याविरुद्ध पाप केले तर केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस. 16जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’#18:16 अनु 19:15 17यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.
18“मी तुम्हाला खरोखर सांगतो, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
19“मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल. 20कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.”
निष्ठुर चाकराचा दाखला
21मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?”
22येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!
23“म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता. 24हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे#18:24 एक तालंत अंदाजे 20 वर्ष मजुरीची रक्कम होती कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले. 25त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली.
26“तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’ 27तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले.
28“पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे#18:28 एक दिनार एका दिवसाची मजुरी होते कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली.
29“त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’
30“पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. 31जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.”
32तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस; 33ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय? 34मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.
35“जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

Currently Selected:

मत्तय 18: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Free Reading Plans and Devotionals related to मत्तय 18

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy