YouVersion Logo
Search Icon

इब्री 11

11
कृतिशील विश्वास
1विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री असा आहे. 2पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.
3विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाली; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही.
4विश्वासाद्वारे हाबेलाने काइनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो.
5विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.”#11:5 उत्प 5:24 हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाला होता की तो हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होता. 6विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध करणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.
7विश्वासाद्वारे नोहाने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोहाने विश्वासामुळेच जगाचा न्याय केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.
8जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कोठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. 9तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तेथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले. 10विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व घडविलेल्या अशा पाया बांधलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता. 11विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करीलच हे तिला माहिती होते. 12आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला.
13ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते. 14त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवतात. 15त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते, 16पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे.
17परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्यांना वारसाचे वचन प्राप्त झाली होती तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला; 18जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाच्याद्वारे तुझ्या संततीची गणना होईल,”#11:18 उत्प 21:12 तरीदेखील. 19अब्राहामाने तर्क केला की इसहाक मरण पावला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करतील; आणि तसे म्हणावे तर त्याला इसहाक मरणातून पुन्हा जिवंत मिळाला.
20विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला.
21याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असताना, उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व योसेफाच्या दोन्ही मुलांना विश्वासाने प्रार्थना करून आशीर्वाद दिला.
22जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली!
23विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही.
24मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारो राजाचा नातू म्हणवून घेण्‍यास नाकारले, 25व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. 26इजिप्त देशामधील सार्‍या भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. 27विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. तो पुढे पुढे चालतच राहिला; प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याबरोबर आहे, असे त्याला दिसत होते. 28म्हणूनच त्यांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या जेष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे.
29इस्राएली लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि कोरड्या जमिनीवरून चालत जावे तसे ते तांबड्या समुद्रातून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते सर्व बुडून मेले.
30परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली.
31विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही.
32तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावीत? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्टा यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. 33विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली, व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; 34आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. 35काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत असे मिळाले. पण दुसर्‍या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. 36काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून ते तुरुंगात टाकण्यात आले. 37काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण बकर्‍यांची व मेंढयाची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले असे होते. 38हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहांत आणि बिळांत राहत असत.
39या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत; 40कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती.

Currently Selected:

इब्री 11: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in